ग्राम पंचायत ठेंगोडा मध्ये आपले स्वागत आहे. आमचा गाव हा नाशिक जिल्ह्यातील एक सुंदर आणि समृद्ध गाव आहे जिथे पारंपरिक मूल्ये आणि आधुनिक विकास यांचा सुंदर मिलाफ आहे. आम्ही आमच्या गावाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहोत.
इतिहास
ठेंगोडा गावाची स्थापना ३० मे १९५२ रोजी झाली असून ते अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहे.ठेंगोडा हे नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील गिरणा नदीकाठी वसलेले प्राचीन व ऐतिहासिक गाव असून येथे जागृत श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर प्रसिद्ध आहे. ब्रिटिशकालीन न्यायालयाचे अवशेष व सूतगिरणीचे अस्तित्व गावाच्या इतिहासाची साक्ष देतात. शेतीप्रधान संस्कृती, मंदिरे, जुने वाडे व सांस्कृतिक परंपरा यामुळे गावाचा वारसा जिवंत असून आजही ठेंगोडा आधुनिकतेबरोबरच आपला इतिहास व संस्कृती जतन करणारे गाव म्हणून ओळखले जाते.
भौगोलिक माहिती
ठेंगोडा हे नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्याच्या दक्षिण पट्ट्यात विंचूर-प्रकाशा महामार्गावर वसलेले गाव असून ते सटाणा व देवळा या तालुक्यांच्या मध्यभागी स्थित असल्याने दळणवळणाच्या उत्तम सुविधांनी समृद्ध आहे. गावापासून जिल्ह्याचे ठिकाण नाशिक सुमारे ८५ कि.मी. तर तालुक्याचे ठिकाण बागलाण फक्त ८ कि.मी. अंतरावर आहे.
जनगणना माहिती
ठेंगोडा गावाची २०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या ७६६० असून १५२३ कुटुंबे आहेत. यात पुरुषांची संख्या ३९७२ (५१.८५%) व महिलांची संख्या ३६८८ (४८.१५%) आहे. गावात अनुसूचित जमातींची लोकसंख्या १९६० (२५.६%), अनुसूचित जातींची लोकसंख्या ८८७ (११.६%) तर इतरांची लोकसंख्या ४८१३ (६२.८३%) आहे.
पायाभूत सुविधा
गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रस्ते, वीज पुरवठा, आरोग्य केंद्र, शाळा आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. ग्रामपंचायत या सर्व सुविधांचे नियमित देखभाल आणि सुधारणा करते.
संस्कृती आणि परंपरा
ठेंगोडा गावाचे सांस्कृतिक व धार्मिक वैशिष्ट्य म्हणजे गिरणा नदीकाठी वसलेले श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर होय. निसर्गरम्य वातावरणात वसलेले हे देवस्थान भाविकांना शांती व समाधान प्रदान करते. येथे दर सहा महिन्यांनी अंगारकी चतुर्थी व प्रत्येक संकष्टी चतुर्थीला उत्साहात यात्रा भरते, ज्यामुळे दूरदूरवरचे भाविक दर्शनासाठी येतात. या धार्मिक सोहळ्यांसोबतच गावातील लोककला, सण-उत्सव व जत्रांची परंपरा ठेंगोड्याला एक आगळीवेगळी सांस्कृतिक ओळख प्रदान करते.
भविष्यकालीन योजना
ग्रामपंचायत ठेंगोडा च्या भविष्यकालीन योजनांमध्ये गावाच्या पायाभूत सुविधांचे सुधारणा, शिक्षण आणि आरोग्य सुविधांचा विस्तार, रोजगार निर्मिती आणि पर्यावरण संरक्षण यांचा समावेश आहे.
गावाच्या प्रतिमा

संपर्क माहिती
संपर्कासाठी: ग्रामपंचायत कार्यालय, ठेंगोडा, ता. बागलाण , जिल्हा नाशिक, महाराष्ट्र - ४२३१०१, ईमेल: nskgpthengoda45@gmail.com